हिंदवी स्वराज्य राखुया , महाराष्ट्र धर्म वाढवूया

नमस्कार , हिंदू बांधव आणि भगिनींनो 🙏

आपण सारे छत्रपती शिवरायांनी निर्माण केल्या हिंदवी स्वराज्यातील स्वाभिमानी हिंदू आहोत आणि स्वार्थी राजकारण बाजूला ठेवून आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की जातीभेद करणे हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि तसेच आपल्या भारत देशाला अतिशय घातक आहे. 


आपल्या देशात आणि त्यातील अनेक राज्यात फार पूर्वी पासून अनेक जाती, धर्म व पंथाची माणसे राहतात. ह्या विविध जाती त्यांच्या परंपरा आपापल्या परीनं जपत असतात. प्रत्येक जातीचे एक वैशिष्ट्य असते आणि त्यांनी ते जपलेच पाहिजे...पण, म्हणून त्यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करणे हे आपल्या भारतीय, सनातन हिंदू संस्कृतीत बसत नाही. फार पूर्वी ज्यांनी असे केले ते ही दोषी होते आणि आत्ताही जे असे करत आहेत ते ही तितकेच दोषी आहेत.


व्यक्तिगत स्वार्थासाठी कोणाचाही द्वेष करणे हा जसा एक वाईट स्वभाव आहे तसेच तो द्वेष पिढी दर पिढी मनात बाळगून एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या समाजाचा पराकोटीचा तिरस्कार करणे ही कमालीची वाईट प्रवृत्ती आहे.


आपल्या इतिहासात अशा बऱ्याच व्यक्ती होऊन गेल्या ज्या स्वार्थी राजकारणाने प्रेरित होऊन काही व्यक्तींचा द्वेष करत होत्या ना की कोणाच्या जातीवरून. 


आजकाल ज्या व्यक्तींचे नाव घेऊन राजकारण केले जाते त्या म्हणजे "अनाजी पंत" आणि "कृष्णाजी भास्कर" . ह्या दोन्ही व्यक्ती एका विशिष्ट राजकारणाने प्रेरित होत्या. 


अनाजी हा छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजाच्या वेळेस स्वराज्यात राजकारण करीत होता तर कृष्णाजी फितूर होऊन अफजल खानाची साथ देत होता. पण, फक्त ह्याच व्यक्ती दोषी आहेत का ? तर नाही...स्वराज्याचे जसे शत्रू बाहेरील होते तसे आतमधील सुद्धा...अगदी शिवरायांचे नातेवाईक सुद्धा. 


बरं , त्या व्यक्ती ज्या जातीतील होत्या त्याच जातीत छत्रपती शिवाजी महाराज पण जन्माला आले होते. पण , त्या स्वार्थी व्यक्तींना छत्रपती शिवराय अर्थात भोसले घराण्याला महाराष्ट्राची सत्ता मिळवू द्यायची नव्हती म्हणून त्यांनी स्वराज्याशी फितुरी करून #महाराष्ट्र_धर्म वाढविण्याच्या मार्गात अडथळे आणायचा प्रयत्न केला पण तो सर्वस्वी अयशस्वी ठरला. आणि, त्याचे कारण होते खुद्द छत्रपती शिवरायांचे अठरापगड जातींना बरोबर घेऊन #हिंदवी_स्वराज्य , रयतेचे स्वराज्य निर्माण करायचे शुद्ध राजकारण. 


जशी स्वराज्यातील काही मंडळी फितूर होती तशीच काही मंडळी शिवरायांच्या बाजूला ही होती. त्यांनी सर्वांनी मिळून शिवरायांच्या अधिपत्याखाली आपल्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. मग, ते प्रत्यक्षात उतरलेले स्वप्न आपण सर्वांनी मिळून जपायला नको का ?


आणि , म्हणून...अनाजी पंत असोत वा बाजी घोरपडे...कृष्णाजी भास्कर असोत वा गणोजी शिर्के ह्या स्वार्थी राजकारणाने बरबटलेल्या प्रवृत्ती आहेत हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे . ह्या प्रवृत्ती आणि त्यांच्या आड स्वार्थी राजकारण करणारी मंडळी, ही छत्रपती शिवरायांनी मिळवलेले स्वराज्य धुळीस मिळवतील. तसे होऊ नये म्हणून त्यांच्या समोर आपण सोनोपंत डबीर , हांबिर राव मोहिते , मोरोपंत पिंगळे , जिवा महाला अशी अनेक उदाहरणे ठेवून महाराष्ट्र धर्म राखला व वाढविला पाहिजे.


छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ह्या वर्षी ३५० वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ह्या निमित्ताने आपण सर्व जण मिळून त्यांचे हे स्वराज्य सुरक्षित राखण्यासाठी एक शपथ घेऊयात की "आम्ही सर्व सर्व जातींना, जन जातींना बरोबर घेऊन...हिंदू म्हणून जगू व हिंदू म्हणून मरू" आणि ह्या महाराष्ट्राचा , ह्या भारताचा गौरव वाढवू.


जय हिंद जय महाराष्ट्र 🙏


©️ समीर कुलकर्णी 

Comments

Popular posts from this blog

"गुरुपूजन आणि गुरुतत्व"

कलियुगातील समुद्र मंथन , देशाचे राजकारण आणि सामान्य भारतीय जनता

इतिहासाचे विकृतीकरण भाग १