"गुरुपूजन आणि गुरुतत्व"
"गुरुपूजन आणि गुरुतत्व"
भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे.
गुरू म्हणजे फक्त व्यक्ती नसून ते एक तत्त्व आहे असे मला वाटते.
आपण गुरुपूजनाच्या दिवशी नेहमी एक श्लोक म्हणतो...
"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥"
ह्या श्लोकाची फोड करता असे लक्षात येते की , ब्रह्मा, विष्णू व महेश हे सर्व गुरुस्थानी आहेत आणि गुरु हा साक्षात परब्रह्म आहे.
प्राचीन काळात आपल्याकडे गुरुशिष्य परंपरा आणि गुरुकुल शिक्षण पद्धती होती. काही अंशी ती आजही काही ठिकाणी पाहायला मिळते.
सत्युयुगात प्रभू श्रीराम ह्यांचे महर्षी वशिष्ठ व विश्वामित्र हे गुरू होऊन गेले ज्यांना ब्रह्मर्षि ही म्हणत असत तर द्वापारयुगात महर्षी वेद व्यास, द्रोणाचार्य , कृपाचार्य असे गुरु होऊन गेले. त्याच युगात एका महान व्यक्ती होऊन गेली ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे त्यांच्या लहानपणी सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेत होते.
ह्या सर्वांमध्ये गुरुशिष्याचे एक अतिशय सुरेख असे नाते होते.
असो, ह्या सर्वांमध्ये..अशी कोण व्यक्ती आहे की जी मला गुरू म्हणून आवडेल ,असे कोणी विचारले तर मी सांगेन की भगवान श्रीकृष्ण.
भगवान श्रीकृष हे सर्वार्थाने एक महान गुरू ठरतात. त्याचे साधे आणि सरळ कारण म्हणजे त्यांचे संपूर्ण जीवन आहे आणि त्यांनी वेळोवेळी कौरव पांडवांना केलेले मार्गदर्शन आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलेली महाभगवद्गीता हे त्यांनी सांगितलेले आणि आजच्या काळातही मार्गदर्शक ठरणारे तत्त्वज्ञान आहे.
सांगायचे हे की चांगले वाईट , चूक बरोबर आणि धर्म अधर्म ( जीवनातील कर्तव्ये ) ह्यात कशाचा मार्ग निवडल्याने काय परिणाम होतो हे सांगणारी व्यक्ती ही गुरू असते असे मला वाटते.
भगवान बुद्ध आणि भगवान महावीर ह्यांनी पण त्यांचे तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत त्यांच्या मार्गाने पोहोचवले.
महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही होऊन गेलेल्या प्रत्येक संतांनी हे तत्त्वज्ञान वेळोवेळी त्यांच्या ग्रंथातून , अभंगातून , प्रवचनातून त्या त्या वेळेस मानवजातीला समजेल ह्या भाषेतून रचनेतून सांगायचा प्रयत्न करत आले आहेत.
अगदी आपल्या रोजच्या जीवनातील गोष्टींचा खोलवर विचार केल्यास आपल्याला लक्षात येते की आपण ह्या अशा गुरूंच्या अगदी जवळ असतो...
आपल्या सर्वांची पहिली गुरू ही आई असते. ती आपल्याला खाऊ पिऊ घालते , बोलायला शिकवते , चालायला शिकवते. नेहमीच प्रेम करणारी आई हे वेळ प्रसंगी कठोर ही होते आणि शिक्षाही करते परंतु त्यामागे तिचा उद्देश हा आपके मूळ संस्कारी व विचारी व्हावे ह्याकडे असते.
दुसरे गुरू वडील असतात. त्यांच्या जीवनात त्यांना आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांचे बोल ते कळत न कळत आपल्या मुलांना सांगत असतात आणि त्यांचा तो अनुभव आपल्याला आपल्या जीवनात काही वेळेस कठीण पावले उचलण्यास की.व कठोर निर्णय घेण्यास उपयोगास येतो.
तिसरा गुरू म्हणजे आपले शिक्षक / आचार्य . शालेय जीवनात विद्यार्थी दशेत असताना अगदी अक्षर ओळख करण्यापासून ते आपण घेतलेल्या शिक्षणाची , बुद्धिमत्तेची वेळोवेळी चाचणी घेऊन आपल्याला झालेल्या चुका दाखविण्याची त्यातून बरोबर उत्तर शोधण्याची पद्धत शिकवत असतात. ह्यातूनच एक चांगला नागरिक घडण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणूनच भारतीय परंपरेत माता, पिता, आचार्य ह्यांना आपण गुरू स्थानी मानतो.
जो गुरु आपल्याला विद्यार्थी दशेत असताना त्याग, तपस्या, शौर्य, ज्ञान आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व शिकवितो , मोठ्यांप्रती आदरभाव शिकवितो ह्याचाच अर्थ खऱ्या अर्थाने त्यांना जीवन काय जगायचे त्याचा मौलिक अर्थ सांगत असतो.
ह्याचा मतितार्थ हाच की आई ,वडील आणि आचार्य / शिक्षक जे ज्ञान आपल्याला देत असतात ते एक गुरुतत्व असते आणि आपण त्या गुरुतत्वाला एक अर्थाने तत्वज्ञान ही म्हणू शकतो असे मला वाटते.
गुरुपूजनाच्या दिवशी गुरुदक्षिणा देणे म्हणजे शिष्याने गुरूंमार्फत राष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्यांसाठी दिलेले वचन असते, ते त्याचे गुरूंच्या पायांशी केलेले समर्पण असते. शिष्याने किंवा विद्यार्थ्याने आपला वेळ, श्रम, कौशल्य आणि चारित्र्य यांचे राष्ट्रकार्यासाठी समर्पण करणे ही खरी गुरुदक्षिणा आहे असे मला वाटते.
जो अज्ञानातून ज्ञानाकडे, दुर्बलतेतून सामर्थ्याकडे आणि स्वार्थातून राष्ट्रार्थाकडे नेतो तो खरा गुरू असतो.
म्हणून , गुरुपूजन हे फक्त गुरपुजनाच्या दिवशी करायचे नसून तो आयुष्यभराचा संकल्प आहे.
आपल्या जीवनातील प्रत्येक कृती राष्ट्रहितासाठी अर्पण करण्याची प्रार्थना आपल्याला आपल्या गुरूकडून प्राप्त होते म्हणून गुरुला आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे.
©️ समीर कुलकर्णी
Comments
Post a Comment