कलियुगातील समुद्र मंथन , देशाचे राजकारण आणि सामान्य भारतीय जनता

कलियुगातील समुद्र मंथन , देशाचे राजकारण आणि 
सामान्य भारतीय जनता. 

आपल्या सर्वांना माहिती आहे की , #अमृतकलश मिळविण्यासाठी देव आणि दानव विष्णू कडे गेले असता विष्णूने त्यांना समुद्र मंथन करण्यास सांगितले. विष्णू म्हणाले की ह्या मंथनातून जे बाहेर येईल ते देव आणि दानव ह्यांनी वाटून घ्यावे.

ह्या मंथनाचा संदर्भ घेता, जसे देव आणि दानव ह्यांच्या मध्ये समुद्रमंथन झाले होते तशाच प्रकारचे काहीसे मंथन , आपल्या देशात गेली काही दशके देशातील सरकार आणि विरोधक ह्यांच्यात चालू आहे. ह्यात सामान्य जनता म्हणजे , ज्या पर्वताला नाग गुंडाळला तो पर्वत की तो नाग की ज्या कासावावर तो पर्वत होता हे ज्याने त्याने ठरवावे. अर्थात देव आणि दानव कोण हे सुध्दा जनतेलाच ठरवावे लागणार आहे ,  आणि, मंथनातून जे जे बाहेर येईल त्यातील आपल्या देशाला, समाजाला काय चांगले आणि काय वाईट आहे हे सुध्दा ठरवावे लागणार आहे.

समुद्र मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली होती तर कलियुगातील ह्या मंथनातून काय काय बाहेर पडेल हे काही आत्ताच सांगता येणार नाही.

अर्थात ह्या मंथनाची सुरुवात २०१४ पासून झालेली आहे असे समजायला हरकत नाही. 

कालकुट विष
त्या मंथनातून सगळ्यात पहिल्यांदा "कालकुट विष" बाहेर पडले होते , जे की भगवान शंकराने पिऊन टाकले आणि ते नीळकंठ झाले.
ह्या कलियुगातील मंथनातून बाहेर पडणारे हे विष नक्की कोण पिणार हे येणारा काळच सांगेल. हे विष म्हणजे देशाला नको असलेल्या गोष्टी , देशाच्या एकात्मतेला बाधक असणाऱ्या गोष्टी.

कामधेनू
मंथनातून दुसरी बाहेर आली ती "कामधेनू". गाय ही निर्मळतेचे प्रतिक आहे. ती देवांनी ठेवून घेतली. ह्या गायी प्रमाणे जनतेचे मन निर्मळ आहे...इच्छा आहे की सरकार आणि विरोधकांचे मन ही जनतेसारखे निर्मळ असावे. कारण, मन निर्मळ असेल तर अनेक विधायक गोष्टी साध्य करता येतात.

उच्चैश्रवा घोडा
समुद्र मंथनातून तिसरा बाहेर आला तो "उच्चैश्रवा घोडा". त्याला असुरांचा राजा बळी याने आपल्याजवळ ठेवले. उच्चैश्रवा घोडा मनाच्या गतीचे प्रतिक आहे असे म्हणतात. मनाची गतीच सर्वाधिक मानली जाते. जर आपल्याला हवे असलेले साध्य गाठायचे असेल तर आपल्या मनाच्या गतीला आवर घालावा लागेल , किंवा त्याची गती आपल्याला नियंत्रित करता आली पाहिजे. सध्या सोशल मीडिया मुळे आपल्या सारख्या नेटकर्यांची मनाची गती आणि तंत्रज्ञान ह्यामुळे त्या गतीला अजूनच वेग मिळाला आहे. तो नियंत्रित असला पाहिजे. व्यक्त होण्या आधी अभ्यास केला पाहिजे.

ऐरावत हत्ती
समुद्र मंथनातून चौथ्या क्रमांकावर निघाला 
"ऐरावत हत्ती". त्याला चार मोठाले सुळे होते. तो देवराज इंद्राने घेतला. ऐरावत हत्ती बुद्धीचा प्रतिक आहे. त्याचे चार सुळे म्हणजे लोभ, मोह, वासना आणि क्रोध याचे प्रतीक आहेत. 
जशी देशातील प्रशासनात काम करणारी लोकं ही बुद्धिवान माणसे असतात त्याचं प्रमाणे सामान्य जनता सुध्दा बुद्धिवान असते. आपल्या शुद्ध ,निर्मळ मनाने व बुद्धीनेच आपण या विकारांवर नियंत्रण ठेवू शकतो. त्यांनी वेळोवेळी सरकार आणि विरोधक ह्यांच्या चारही सुळ्यांना नियंत्रित ठेवले पाहिजे. पण, सद्य परिस्थितीत हे चारही विकार प्रशासनात आणि सामान्य जनतेत सुध्दा आहेत हे देशाचे दुर्दैव आहे. 

कौस्तुभ मणी
समुद्र मंथनातून पाचव्या क्रमांकाला निघाला "कौस्तुभ मणी". भगवान विष्णूंनी त्याला आपल्या हृदयावर धारण केला. कौस्तुभ मणी भक्तीचे प्रतिक आहे. जेव्हा आपल्या मनातून सर्व विकार निघून जातील तेव्हा तिथे केवळ भक्तीच उरेल असा समज आहे. सरकार आणि विरोधकांनी व त्याच बरोबर सामान्य जनतेने आपल्या भारतमातेला कौस्तुभ मणी समजावे आणि त्यांच्या हृदयात स्थान देणे आवश्यक आहे म्हणजे देशाच्या प्रगतीला जे गरजेचे आहे ते साध्य होईल. 

कल्पवृक्ष
समुद्र मंथनातून सहाव्या क्रमांकाला निघाला , तो सर्व इच्छा पूर्ण करणारा "कल्पवृक्ष". त्याला देवतांनी स्वर्गात स्थापित केले. कल्पवृक्ष प्रतिक आहे आपल्या इच्छांचे. इथे सरकार आणि विरोधक आणि सामान्य जनता ह्यांच्या अंगी ऐरावताच्या चारही सुळ्यांमधील मोह आणि लोभ असतील आणि जर ते अमृत प्राप्तीसाठी (भारतमातेच्या परमवैभवासाठी) प्रयत्न करत असतील तर त्यांना ह्या इच्छांचा त्याग करावाच लागेल. 

रंभा अप्सरा
समुद्र मंथनातून सातव्या क्रमांकाला निघाली "रंभा" नावाची अप्सरा. तिने सुंदर वस्त्र आणि आभूषणे परिधान केलेली होती. तिची चाल मनाला भुरळ घालीत होती. ती देखील देवतांकडे गेली. अप्सरा वासनेचे (ऐरावत हत्तीचा एक सुळा) प्रतिक आहे. तुमची वासना तुमचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करते. कलियुगात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या वासना सरकार आणि विरोधक ह्यांना देशहिताचे काम करण्यास प्रवृत्त करते. 

देवी लक्ष्मी
समुद्र मंथनातून आठव्या क्रमांकाला निघाली "देवी लक्ष्मी". असुर, देवता, ऋषी सर्वांची इच्छा होती की लक्ष्मी त्यांना मिळावी, परंतु लक्ष्मीने भगवान विष्णुना स्वीकारले. लक्ष्मी प्रतिक आहे धन, वैभव, ऐश्वर्य ह्यांचे.
कलियुगात ही लक्ष्मी , भरमसाठ पैसा हा भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरत आहे. खरं खोटं देव जाणे पण, सरकार आणि विरोधक हे दोन्हीही भ्रष्टाचार रुपी लक्ष्मी आमच्याकडे नाही असे दाखव्याचा प्रयत्न करीत आहेत आणि सामान्य जनता सुद्धा बऱ्याच अंशी भ्रष्टाचाराला खतपाणी घालते आणि त्याची बळी पण ठरते.

वारुणी देवी
समुद्र मंथनातून नवव्या क्रमांकावर आली "वारुणी देवी". भगवंताच्या परवानगीने तिला दैत्यांनी घेतले. वारुणीचा अर्थ आहे मदिरा म्हणजेच नशा. ही देखील एक वाईट गोष्ट आहे. नशा कशीही असो, शरीर आणि समाजासाठी ती वाईटच असते. इथे सत्तेची जी नशा आहे त्यातून ना कुठले सरकार चुकले आहे ना कुठले विरोधक. कधी कधी एकमेकांचे विरोधकही सामंजस्याने एकत्र येऊन दुसऱ्या बाजूला सत्तेतून बाजूला काढण्याचे प्रयत्न करतात. 

चंद्र
समुद्र मंथनातून दहाव्या क्रमांकाला निघाला "चंद्र". चंद्राला भगवान शंकराने आपल्या मस्तकावर धारण केले. चंद्र प्रतिक आहे शीतलतेचे. जेव्हा तुमचे मन वाईट विचार, लालसा, वासना, नशा इत्यादींपासून मुक्त होईल तेव्हा ते चंद्राप्रमाणेच शीतल होईल. देशातील प्रत्येकाने ह्या चंद्राला आपल्या मस्तकी ठेवला पाहिजे जेणेकरून त्यांची मानसिक स्थिती कुठल्याही परिस्थितीत शांत राहील. 

पारिजात वृक्ष
यानंतर समुद्र मंथनातून "पारिजात वृक्ष" निघाला. या वृक्षाचे वैशिष्ट्य होते की त्याला स्पर्श करताच थकवा नाहीसा होत होता. हा देवांना मिळाला. समुद्र मंथनातून पारिजात वृक्ष निघण्याचा अर्थ ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक असलेली शांतता मिळावी म्हणून होता. देशातील जनतेमध्ये राजकीय, भौगोलिक , सामाजिक परिस्थितीमुळे राग, द्वेष , मत्सर आणि नैराश्य सुद्धा आले आहे. त्यामुळे साहजिकच अशांतता माजली आहे. जर सामाजिक समरसता रुपी पारिजात वृक्ष देशातील प्रत्येकाने आपल्या मनात रुजवला तर देशाचे सामाजिक स्थैर्य अबाधित राहील असे मला वाटते. 

पांचजन्य शंख
समुद्र मंथनातून बाराव्या क्रमांकाला निघाला "पांचजन्य शंख". तो भगवान विष्णूंनी घेतला. शंखाला विजयाचे प्रतिक मानले गेले आहे. तसेच त्याचा नाद (ध्वनी) देखील अत्यंत शुभ मानला गेला आहे. भारतमातेचा जयघोष हा नाद जर समाजातील प्रत्येकाने आपापल्या मनातील पांचजन्याने केला तर तो संपूर्ण देशात नवचैतन्य आणल्याशिवाय राहणार नाही. 

भगवान धन्वंतरी
समुद्र मंथनातून सर्वांत शेवटी "भगवान धन्वंतरी" आपल्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी म्हणजे निरोगी शरीर आणि निर्मळ मनाचे प्रतिक. जेव्हा तुमचे शरीर निरोगी आणि मन निर्मळ असेल तेव्हाच त्या अमृताची खरी चव तुम्हाला कळेल. योगसाधना , अध्यात्म , निरोगी शरीर आणि निरोगी मन जर समाजातील प्रत्येकाने आत्मसात केले तर आपला देश सुध्दा निरोगी होईल. 

अमृत कलश
समुद्र मंथनातून चौदाव्या क्रमांकाला "अमृत" निघाले. अमृतात होते ५ कामेंद्रीय, ५ जननेन्द्रिय आणि अन्य ४ आहेत मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या सर्वांवर नियंत्रण मिळवल्या नंतरच परमात्मा प्राप्त होतो. देशातील सरकार आणि विरोधक आणि त्याच बरोबर प्रशासन ह्या सर्वांनी ह्या सर्वांवर नियंत्रण मिळवले तर उज्वल भारत , निरोगी भारत , शांत भारत , बुद्धिमान भारताचे दर्शन साऱ्या जगताला होईल आणि पुन्हा एकदा आपली भारत माता साऱ्या जगाचे नेतृत्व करेल ह्यात काही शंका नाही. 

कलियुगातील हे मंथन आपल्या देशासाठी खूप महत्वाचे आहे आणि त्यात देशातील संपूर्ण जनतेचा , प्रत्येक समाजाचा ह्या मंथनासाठी हातभार लागला पाहिजे आणि जे गरजेचे ते आणि जेव्हढे गरजेचे तेव्हढेच मिळावे आणि विषजन्य विचार , आचार ह्या देशातून हद्दपार व्हावा असे मनापासून वाटते. 

©️ समीर कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

"गुरुपूजन आणि गुरुतत्व"

इतिहासाचे विकृतीकरण भाग १