छत्रपती शिवाजी महाराज यांस महाराष्ट्राकडून एक पत्र.

प्रति, 
निश्चयाचा महामेरू ! श्रीमंत योगी !
श्रीमंत ,श्री छत्रपती शिवाजी महाराज !!! यांस
मानाचा मुजरा 🙏🙏🙏

महाराज, कसे आहात तुम्ही ? तसं तर मला प्रत्येक दिवशी , प्रत्येक क्षणी आपली खूप आठवण येते.... पण, आज खास हे पत्र लिहायला बसलो. कारण ही तसेच आहे म्हणा...

हे वर्ष आपण आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे म्हणजे "अमृत महोत्सवी वर्ष" म्हणून साजरे करत आहोत , त्यात अजून एक विशेष बाब म्हणजे "सन २०२३-२०२४ या वर्षात शिवराज्याभिषेक शक ३५० हा ही येत आहे. म्हणजेच तुमच्या राज्याभिषेकाची , ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी चालू वर्षात २ जून रोजी येत असून २०२४ मध्ये ही तिथी २० जून रोजी येत आहे. तेंव्हा दिनांक २ जून २०२३ पासून २० जून २०२४ या काळात शिवराज्यभिषेक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 

महाराज, इतक्या प्रदीर्घ काळानंतरही , स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा विचार करताना , सर्व प्रथम जर कोणाचे नाव आमच्या तोंडी येत असेल तर ते तुमचे कारण , तुमच्या शिवाय स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे दोन्ही शब्द अपूर्णच आहेत.

तुमच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या भूमीचा प्रत्येक भाग आज स्वराज्याची आणि स्वातंत्र्याची ग्वाही देत आहे. 

साधारण ३९४ वर्षांपूर्वी संपूर्ण देशावर आणि माझ्यावर मुघल शाही, आदिल शाही, निजाम शाही आणि कुतुब शाही सारख्या अनेक म्लेछांच्या स्वाऱ्या होत असताना, आपले स्वकीय आपापसात भांडत होते , प्रजेवर अमानुष अत्याचार होत होता....आणि त्याच वेळेला आपल्या मातोश्री आई जिजाबाईंच्या पोटी आणि शहाजी राजांच्या घराण्यात तुम्ही जन्म घेतला आणि जणू ह्या भूमीवर पुन्हा भगवान विष्णूनेच अवतार घेतला.
पुढे , एकीकडे जनतेची लूट होत होती तर दुसरीकडे त्याविरुद्ध पुण्यश्लोक आई जिजाबाईंनी तुम्ही मोठे होत असताना तुम्हाला स्वराज्याचा मंत्र दिला , त्यानंतर रायरेश्वरा्वर तुम्ही घेतलेली स्वराज्याची शपथ आणि स्वराज्यासाठी तुम्ही केलेला शिवप्रताप हा एक सुवर्ण इतिहासच आहे. 

तुमच्यानंतर , धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज , छत्रपती राजाराम महाराज ,पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज व वेळोवेळी झालेल्या स्वराज्याच्या पंतप्रधान पेशव्यांनी, शुर सरदार घराण्यांनी आणि पराक्रमी मावळ्यांनी , अहोरात्र कष्ट करून , झुंज देऊन स्वराज्याचा भगवा आणि आणि तुम्ही निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य वाढवले , स्वराज्याचा नकाशा मोठा झाला, अगदी दिल्ली आणि त्याहूनही कितीतरी पुढपर्यंत...अटकेपार पोहोचवले.

पण , नंतर काही वर्षांनी आपापसातील भांडणे , भाऊबंदकी आणि सत्तेच्या हव्यासापोटी आपला देश पुन्हा पारतंत्र्यात गेला. नंतर आलेले डच, पोर्तुगीज आणि इंग्रजांनी केलेल्या अमानुष अत्याचारामुळे गलितगात्र झालेल्या भारतात , देशाच्या स्वातंत्र्यासाठी ,स्वतःच्या प्राणाची बाजी लावणारे लाखो स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले आणि त्या प्रत्येक स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणा स्थान तुम्हीच होता , महाराज. 

पण, मी हे तुम्हाला काय सांगतोय...
आम्हा सर्वांना माहिती आहे की आजही तुमचे माझ्यावर नक्कीच लक्ष असेल कारण तुम्ही जेव्हढा विचार माझा, ह्या महाराष्ट्राचा केला...तेव्हडा विचार आज पर्यंत कोणी केला असेल...असे मला नाही वाटत.

आपल्या मातोश्री आणि सर्वार्थाने, आम्हा सर्वांच्या सुध्दा आई, पुण्यशील राजमाता जिजाबाई साहेबांनी तुमच्या मनात स्वराज्याचा जो अंकुर पेरला होता त्याचा आज इतक्या वर्षांनंतर एक महाप्रचंड वटवृक्ष झाला आहे आणि तोही तुम्ही पहात असालच.

ह्या वटवृक्षावर येणाऱ्या प्रत्येक पाखराला आणि त्याच्या सावलीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुमचा व तुमच्या विचारांचा काळत नकळत एक भावनास्पर्श झाला असेल ह्यात काही शंकाच नाही. ह्या वटवृक्षाच्या प्रत्येक पारंबित , आपल्या विचारांचे अस्तित्व आहे हे आम्हा सर्वांना जाणवते कारण, ह्या पारंब्या फक्त माझ्या गावोगावी , काना कोपऱ्यात , सह्याद्रीच्या गड किल्ल्यांवरच पोहोचल्या नाहीत तर सर्वदूर ,अखंड हिंदुस्थानात त्या खूप खोलवर रुजलेल्या आहेत ..ते ही स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा विचार घेऊन.

आणि म्हणूनच की काय, मला मिळालेल्या प्रत्येक यशात तुमच्या नावाचा जय जयकार असतो . आपली प्रजा तुमच्या प्रतिमा ,तुमचे अश्वारूढ किंवा सिंहासनाधिश्वर पुतळे हे नुसते लावतच नाही नाही तर त्यांची यथासांग पूजा सुध्दा करते. अगदी रस्त्यावरून जाता येता सुद्धा तुमचा अश्वारूढ पुतळा दिसला की नकळतच त्यांचा हात हृदयाशी जातो आणि "जगदंब" हे शब्द आपसूकच बाहेर पडतात...मला अगदी स्पष्ट ऐकू येतात ते.

शिवजयंतीला आणि शिवराज्याभिषेक दिवसाला तर इथली ही लाल काळी माती देखील "छत्रपती शिवाजी महाराज की जय" असा जय जयकार करते...ह्या दिवशी तिला सुध्दा एक वेगळाच सुगंध प्राप्त झालेला असतो...ह्या सुगंधा पुढे, मला तर कस्तुरीचा सुगंध ही फिकाच वाटतो.

स्वराज्य मिळविताना ज्या ज्या मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावून शक्तीचे आणि ज्या संतांनी वेळोवेळी भागवत धर्माची पताका हाती घेऊन प्रजेला भक्तीचे दर्शन घडविले ,त्यांचेही तेवढेच कौतुक अजूनही तुमच्या ह्या महाराष्ट्राला आहे बरं...दरवर्षी ज्ञानेश्वर माऊलींची आणि तुकोबारायांची , सोपान देवांची , मुक्ताईची आणि अशा अनेक थोर संतांच्या दिंड्या आषाढी कार्तिकीला पंढरपुरात पोहोचतात आणि विठुरायाचे मनोमन दर्शन घेतात. 
एक राजा म्हणून थोरा मोठ्यांचा , संतांचा व गुरूंचा मान कसा ठेवावा , हा आदर्श ही तुम्ही घालून दिल्यानंतर तुमची ही प्रजा तो आदर्श कसा बरं मोडेल ? 

शत्रूच्या तावडीतून तुम्ही मिळविलेले , ह्या सह्याद्रीतील गड किल्ले हे तर माझे आभूषण आहेत. आजही अनेक जण , तुमचे आणि मावळ्यांचे शौर्य ऐकण्यासाठी , ते अप्रत्यक्षरीत्या अनुभवण्यासाठी, तुम्ही गाजविलेल्या इतिहासाचे स्मरण करण्यासाठी, ह्या गड किल्ल्यांवर येत असतात आणि ह्या विशाल सह्याद्रीत भटकंती करत असतात , तेव्हा माझं मन भरून पावतं....

माझा शेतकरी जेव्हा आपल्या शेतात सोनं पिकवतो , तेव्हा मला तो दिवस आठवतो जेव्हा तुम्ही ह्या भूमीवर सोन्याच्या नांगर फिरवला होता. त्याच वेळेला मला जाणवले की माझ्यावर आणि ह्या प्रजेवर आलेली काळरात्र आता संपली. त्या रात्री मी आनंदाने अगदी न्हाऊन गेलो होतो...

तुमचे युद्ध निती आणि युद्ध तंत्र , राज्य व्यवस्थापन, राजकारणातील दूरदृष्टी , प्रजेसाठीची न्यायव्यवस्था , हे आता इथल्या शाळा , कॉलेज मध्ये एक उच्चतम अभ्यास म्हणून अभ्यासले जातात. तुम्ही युद्धात वापरलेला गनिमीकावा आता आपल्या देशाचे समर्थ सैन्य सुध्दा त्यांच्या युद्ध कलेत वापरते...तुम्ही चालू केलेले आरमार जसे बळकट होते तसेच आत्ताचे आरमार आज दिमाखात माझे संरक्षण करते.

हे सारं काही सुरळीत असताना सुध्दा, एक खंत मात्र आहे की , तुमच्या वेळी जशी मुघल शाही ,आदिल शाही , निजाम शाही , कुतुब शाही सारखे स्वराज्यावर वाईट नजर असणारे स्वराज्यात राहूनही त्यांची साथ देणारे स्वराज्याचे नुकसान करणारे अनेक आंतरिक शत्रू होते तसे थोड्या फार प्रमाणात आजही आहेत , जे अजूनही माझे वाईट चिंतत असतात पण, तुमच्या विचारांनी प्रेरित झालेल्या मग ती स्त्री असो वा पुरुष , बाल असो वा युवक किंवा वृद्ध...कोणालाही असल्या शत्रूंची अजिबात भीती वाटत नाही.

आपले सीमेवर लढणारे सैन्य आणि सीमेच्या आत शिवविचारांनी ऊर्जा मिळालेले मावळे , हे तुम्ही मिळविलेल्या स्वराज्याचे आणि स्वातंत्र्य सैनिकांनी मिळविलेल्या स्वातंत्र्याचे नक्कीच रक्षण करतील अशी मला खात्री आहे....अर्थात, तुम्हालाही ती असणारच.

बहुत काय लिहणे....तुमच्यापाशी मागणे फक्त एकच की तुमचे आशीर्वाद माझ्या लेकरांच्या आजन्म पाठीशी असूद्या 🙏🙏

तुमच्या चरणी साष्टांग दंडवत आणि पुन्हा एकदा मानाचा मुजरा....🙏🙏🙏

आपला महाराष्ट्र

©️ समीर कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

"गुरुपूजन आणि गुरुतत्व"

कलियुगातील समुद्र मंथन , देशाचे राजकारण आणि सामान्य भारतीय जनता

इतिहासाचे विकृतीकरण भाग १