एका इतिहास पुरुषाशी झालेली आभासी भेट....

एका इतिहास पुरुषाशी झालेली आभासी भेट....

बरोबर एक ते दीड वर्षांपूर्वी आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांची भेट घेण्याचे ठरविले होते. 

पहिले Lockdown जेव्हा लागले , तेव्हा अचानक एके दिवशी माझ्या मनात विचार आला आणि मी बाबासाहेबांनी लिहिलेल्या राजा शिवछत्रपती ह्या ग्रंथाचा संदर्भ घेऊन छत्रपती शिवरायांवर एक पोथी लिहायला घेतली. लिहीत असताना , मला खूप इच्छा झाली की मी लिहीत असलेल्या काही ओव्या त्यांना कधीतरी समोरासमोर बसून वाचून दाखवाव्यात.

माझे लिखाण नियमित चालू होते...एके दिवशी बाबासाहेबांना फोन करायचे ठरविले. मी टिपरे काकांचा फोन नंबर घेतला . प्रतापराव टिपरे काका बाबासाहेबांच्या बरोबर होते तेव्हा त्यांना फोन करून तसे विचारले. कोरोनाची पाहिली लाट संपली होती तर भेटता येईल का ? त्यांनी सांगितले की वयोमानामुळे कोरोनाच्या परिस्थितीत त्यांना भेटणे योग्य नाही. मलाही ते पटले..पण , मनात चलबिचल होत होती. टिपरे काकांनी सांगितले की सध्या त्यांना स्वतःला बरे नसल्यामुळे तेच बाबासाहेबांच्या बरोबर राहत नाहीयेत. पण , काही दिवसांनी प्रयत्न करू असे म्हणाले. 

दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात प्रतापराव टिपरे काकांचेच निधन झाल्यामुळे माझी , बाबासाहेबांना भेटायची आशा मला संपल्यासारखे जाणवले. टिपरे काका सुध्दा तेव्हढेच आदरणीय. जवळ जवळ ५० वर्षे ते बाबासाहेबांची सावली असल्यासारखे त्यांच्याबरोबर होते. जाण्यापूर्वी टिपरे काकांनी सध्या बाबासाहेबांबरोबर स्वीय सहाय्यक शैलेशजी ह्यांचा नंबर मला दिला होता. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला. 

एकदा मी ठरविले की , बाबासाहेबांची अशीच एकदम भेट घेऊयात...हा थोडा धाडसी निर्णय घेतला होता मी. माझी पत्नी, मुलगा व मी असे तिघेही पुरंदरे वाड्यात गेलो. पण पुन्हा दुर्दैवाने त्यांची भेट नाही होऊ शकली. त्यांच्या सूनबाई भेटल्या व त्यांनी सांगितले की बाबासाहेब त्यांच्या मोठ्या मुलाकडे आराम करायला गेले आहेत. 

नियतीने परत भेट नाकारली...मग, एके दिवशी मी शैलेश ह्यांना फोन केला आणि बाबासाहेबांची भेट मागितली. तेव्हा बाबासाहेबांना थोडे बरे नव्हते. मी हिम्मत करून त्यांना मी माझ्या लिखाणाबद्दल सांगितले आणि विचारले की मला त्यांच्याशी फोन वरून बोलता येईल का ? त्यांना माझ्या ओव्या वाचून दाखवता येतील का? तेव्हा शैलेशजी हो म्हणाले. 
मला अत्यानंद झाला आणि मी शैलेशजींचे मी मनापासून आभार मानले. मी माझी वही घेऊन बसलोच होतो. फोन speaker वर ठेवून मी , बाबासाहेबांना माझे लिखाण वाचून दाखविले. जो प्रसंग मी वाचून दाखवला त्या भागात शिवरायांचा जन्म झाला होता...मला माझेच लिहिलेले वाचताना डोळ्यातून पाणी वाहत होते.

मी लिहिले आहे - 
प्रसंग - शिवबाचा जन्म -

गडावर होती एक सुरक्षित खोली
तेथेच सारी व्यवस्था केली
स्वस्तिके , शुभचीन्हे रेखण्यात आली
देवांची चित्रे दारावर ..

ती आई होईल कुठल्याही क्षणी
गडावर होत्या जाणत्या सुईणी
दीप उजळले ठिकठिकाणी
दाटून आली उत्कंठा...

आणि मग पहाट झाली
सगळी सृष्टी उजळू लागली
पूर्वा सुध्दा भगवी रंगली
सूर्य येता क्षितिजावर...

अन् वारासुद्धा हर्षावला
दारावरचा पडदा हलला
किल्ल्यावर कल्लोळ उडाला
मुलगा जाहला हो मुलगा...

आणि, मला पुढचे वाचताच येईना...शब्द फुटत नव्हते,आणि डोळ्यातील अश्रू थाबत नव्हते.
एकीकडे प्रसंगात शिवरायांचा जन्म आणि तो ऐतिहासिक प्रसंग ज्यांनी त्यांच्या ऐतिहासिक ग्रंथात प्रत्यक्ष घडला तसा उतरवला , मांडला ते स्वतः बाबासाहेब तो प्रसंग ऐकत होते हा अत्यानंद...

आभासी का असेना पण त्याक्षणी मात्र मला बाबासाहेब माझ्या समोर बसल्यासारखे दिसत होते. लख्ख , तेजस्वी आणि डोळे मिटून ऐकतानाची भावमुद्रा...आणि मी त्यांच्या चरणाशी.

मी लिहिलेले बाबासाहेबांना खूप आवडले असे त्यांनी सांगितले...मी निःशब्द झालो...मला सगळे मिळाल्या सारखे वाटले.

मला खरं तर त्यांना माझं सगळं लिखाण वाचून दाखवायचे होते...त्यांचा प्रत्यक्ष आशीर्वाद घ्यायचा होता..पण, माझे लिखाण अजून पूर्ण झाले नाही. गेले सात दिवस ते आजारी होते , दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये admit होते आणि आज पहाटे बाबासाहेबांनी देह ठेवल्याची बातमी कळली आणि मला रडू कोसळले.

बाबासाहेब तुम्ही मला प्रत्यक्ष भेटला नाहीत परंतु आपली आभासी झालेली भेट मी ह्या जन्मात कधीही विसरू शकणार नाही...ह्याच काय पण परमेश्र्वराकडे मी हेच मागेन की, जेव्हाही मी पुन्हा जन्म घेईन तेव्हा ह्याच महाराष्ट्रात , पुण्यात आणि अशा कुटुंबात घेईन जिथे तुम्ही लिहिलेला राजा शिवछत्रपती हा पवित्र ग्रंथ पुजला जात असेल...आणि शिवछत्रपतींच्या विचारांचे संस्कार होत असतील.

माझे, तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचे स्वप्न अपुरे राहिले असेल , पण आता छत्रपती शिवरायांवर मी लिहीत असलेली पोथी पूर्ण करून तुम्हाला आदरांजली वाहण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे.

माझे हे लिखाण मी छत्रपती शिवरायांना , त्यांच्या वंशजांना आणि तुम्हालाच अर्पण करणार आहे.
शिवरायांवर , माझ्या लिखाणाला तुमचा आभासी आशीर्वाद असेलच , असे मी समजतो.

#जगदंब 

©️ समीर कुलकर्णी 

Comments