एका इतिहास पुरुषाशी झालेली आभासी भेट....
एका इतिहास पुरुषाशी झालेली आभासी भेट.... बरोबर एक ते दीड वर्षांपूर्वी आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांची भेट घेण्याचे ठरविले होते. पहिले Lockdown जेव्हा लागले , तेव्हा अचानक एके दिवशी माझ्या मनात विचार आला आणि मी बाबासाहेबांनी लिहिलेल्या राजा शिवछत्रपती ह्या ग्रंथाचा संदर्भ घेऊन छत्रपती शिवरायांवर एक पोथी लिहायला घेतली. लिहीत असताना , मला खूप इच्छा झाली की मी लिहीत असलेल्या काही ओव्या त्यांना कधीतरी समोरासमोर बसून वाचून दाखवाव्यात. माझे लिखाण नियमित चालू होते...एके दिवशी बाबासाहेबांना फोन करायचे ठरविले. मी टिपरे काकांचा फोन नंबर घेतला . प्रतापराव टिपरे काका बाबासाहेबांच्या बरोबर होते तेव्हा त्यांना फोन करून तसे विचारले. कोरोनाची पाहिली लाट संपली होती तर भेटता येईल का ? त्यांनी सांगितले की वयोमानामुळे कोरोनाच्या परिस्थितीत त्यांना भेटणे योग्य नाही. मलाही ते पटले..पण , मनात चलबिचल होत होती. टिपरे काकांनी सांगितले की सध्या त्यांना स्वतःला बरे नसल्यामुळे तेच बाबासाहेबांच्या बरोबर राहत नाहीयेत. पण , काही दिवसांनी प्रयत्न करू असे म्हणाले. दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात प्रता...